Heavy Rain: मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात उभी असलेली पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या गावोगावी नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट दिली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. मराठवाड्यातील या महाप्रलयाचे सर्वात मोठे कारण ‘हवामान बदल’ (Climate Change) असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागतिक बँकेकडून मिळालेल्या 6,000 कोटी रुपयांच्या निधीचा वापर हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भामध्ये 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान आणि मराठवाड्यात 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यानही पावसाचा जोर वाढेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







