मुंबई : गुजरात, हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला असून यात गुजरात राज्यात भारतीय जनता पक्षाने रेकॉर्डब्रेक विजय मिळविला आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करताना भाजपचा हिमाचल प्रदेशातील सत्तेपासून दूर केले आहे. आम आदमी पार्टीने गुजरात मध्ये घेतलेल्या मतांमुळे या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदय होण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाणार आहे. यामुळे जवळपास सर्वच पक्ष आनंदात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुजरातमध्ये भारतीय पक्षाने १८२ पैकी १५६ जागांवर आघाडी घेताना आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय साकारला आहे. येथे काँग्रेसने १७, आम आदमी पक्षाचे ५ तर इतरांनी ४ ठिकाणी विजयाच्या जवळ आहेत. भारतीय पक्षाने मिळविलेल्या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंती अमित शहा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.
हिमाचल प्रदेशने दर पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षात बसविले आहे. या निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. यावेळी मात्र ६८ पैकी ४० जागा काँग्रेसला देताना हिमाचल प्रदेशातील जनतेने सत्तेची भाकरी फिरवल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाने २५ तर ३ ठिकाणी इतर उमेदवार विजयाच्या समीप आहेत.
आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकित सुमारे १३ टक्के मते घेतली आहे. या मतांमुळे आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आम आदमी पक्षाने गोवा निवडणुकीत देखील लक्षणीय मते मिळविली होती. नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आम आदमी पक्षाने सत्ताबदल घडवून आणला होता. साधारण २५० जागा असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेत ‘आप’ने १३४ जागा जिंकताना सत्ता काबीज केली. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत १०४ जागांवर समाधान मानावे लागले होते.