पुणे : पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ८६५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये फेरबदल होण्याचे संकेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले आहेत. डीपीसी’च्या कामांची यादी देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्किट ‘सर्किट हाउस’ला भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या तक्रारी, गाऱ्हाणी पाटील यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलताना चंद्रकात पाटील यांनी हि माहिती दिली.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, दिलीप खैरे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात दौंड, मावळ वगळता भाजपचा आमदार अद्याप नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. ते कमी करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक दिवस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तालुक्यात एका दिवसात कार्यकर्त्यांची तसेच अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तेथील समस्या, विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. येत्या १४ ऑक्टोबरला जुन्नर, खेड तालुक्यापासून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे.
जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावर असलेल्या सरकारी समित्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांच्या नियुक्तीसह जिल्हा नियोजन समितीवर सररकार नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री आहे. त्या ठिकाणच्या समित्यांमध्ये ७० टक्के भाजपचे, तर ३० शिंदे गटाच्या सदस्यांचा समावेश असेल. जेथे भाजपचा आमदार आहे, तेथेही असाच फॉर्म्युला असेल. जेथे भाजप-शिंदे गटाचा आमदार नाही, त्या तालुक्यांमध्ये ५०:५० टक्के असा समित्यांच्या सदस्यांसाठीचा फॉर्म्युला असेल, अशी चर्चा या वेळी बैठकीत करण्यात आली आहे.