(Gopichand Padalkar )पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पवार घराण्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी टीका करताच राज्यभर संतापाची लाट उमटत असते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ते सातत्याने निशाणा साधत असतात. त्यात आता त्यांनी शरद पवार व त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेची खिल्ली उडवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या ५२ शाखांच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.
शरद पवार यांना टोला..!
आपल्या सभागृहातील बोलण्याचा दाखला देत पडळकरांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील, असे ते म्हणाले आहेत.
पडळकर पुढे म्हणाले की, ज्यांचे चार खासदार असा माणूस पंतप्रधान होवू शकतो का. सभागृहात काही बोलायला गेलो तर ते राष्ट्रीय नेते आहेत असे सांगितले जाते. तुमचा आकडा शंभरच्या वर जात नाही. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील. लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांना बसवा. आणि या तीन राज्यांचा एक देश करुन शरद पवारांना पंतप्रधान करा. म्हणजे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी जहरी टीका पडळकरांनी पवारांवर केली आहे.