Girish Bapat | पुणे : भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने आज (बुधवारी) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर काही वेळानंतरच त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बापट यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. खरा किंगमेकर हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह देशातील नेत्यांनी बापट यांना शब्दरुपी श्रध्दांजली वाहली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतचा विमानतळावरील फोटोही शेअर केला आहे.
”गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना.ओम शांती”, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Shri Girish Bapat Ji was a humble and hardworking leader who served society diligently. He worked extensively for the development of Maharashtra and was particularly passionate about Pune's growth. His passing away is saddening. Condolences to his family and supporters. Om Shanti pic.twitter.com/17M0XpcwpF
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
तर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली. बापटजी शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण संघटन त्यांच्या कुटुंबासोबत उभ आहे. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. ॐ शांति, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.