शिरूर : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान होत आहे. कारखान्याची एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित वीस जागांसाठी निवडणूक होते आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
२५ वर्षे अध्यक्षपदाच्या माध्यमातून घोडगंगा कारखान्यावर एकहाती वर्चस्व राखणारे कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासमोर भाजपसह विरोधकांनी आव्हान उभे केले आहे. अजित पवार, महसूलमंत्री विखे पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी नेते प्रत्यक्ष किंवा सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रचारात उतरले होते.
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वीस जागांसाठी रविवारी (ता. ६) निवडणूक होत आहे. त्यासाठी साठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १९ हजार ३७३ मतदार असून, सकाळी आठ ते पाच दरम्यान, मतदान झाल्यानंतर सोमवारी (ता. ७) न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथील कानिफनाथ गार्डन मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले.