पुणे : छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ल्यांचे स्थापत्य जपण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले.
पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन कोथरूड येथे आयोजित राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील मत मांडले. यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, जुन्या वारशाचे शोधकार्य करणे, त्याचे जतन करणे आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल. राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ते समोर आणण्याचे काम विभागाने करावे. या विषयाबद्दल समाजात कुतूहल असून या क्षेत्रात अजून खूप शोध घेऊन काम करण्याची गरज आहे.
बांधकामास घाईत परवानगी दिल्यास पुराणकालीन वास्तू, वस्तूंच्या जतनकार्यास बाधा येईल. त्यामुळे परवानगी देताना पुरातत्व विभागाने आवश्यक वेळ घेणे स्वाभाविक आहे. असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगडाचे संरक्षण व जतन कामाच्या माहितीपटाचे अनावरण करून लघुचित्रफीत दाखवण्यात आली. २८ ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व त्याची माहिती असलेले पुस्तक पालकमंत्री पाटील यांना देऊन डॉ. वाहणे यांनी त्यांचे स्वागत केले.
तर या प्रदर्शनात राज्य संरक्षित स्मारके, गड किल्ले यांचे जतन व दुरुस्ती कामांची छायाचित्रे, किल्ल्यांचे त्रिमितीय रेखांकन (थ्री डी मॅपिंग) यांची छायाचित्रे, आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.