अजित जगताप
सातारा : वडूज नगरपंचायतीच्या इतिहासामध्ये सव्वा वर्षांपूर्वी दोन प्रमुख पॅनल मध्ये झालेल्या निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून अपक्ष निवडून आले. त्यामुळे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची माळ अपक्षांच्या गळ्यात पडली. त्यापैकी नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या नगराध्यक्षांनी गट बदलण्याचा तांत्रिकदृष्ट्या निर्णय घेतला असला तरी वडूज नगरीच्या विकास कामांच्या तांत्रिक मंजुरीसाठी निधी सुपूर्द करूनही काही प्रभागातील विकास काम बदलल्याने वडूजच्या भर बाजारात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व भाजप या तुल्यबळ पक्षांमध्ये निवडणूक पार पडली. परंतु , या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस तसेच अपक्षांनी चांगलीच बाजी मारल्यामुळे सत्तेचे समीकरण जुळवताना राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांना घाम फुटला. अखेर तडजोडीचा मुद्दा म्हणून अपक्ष नगराध्यक्ष सौ. मनीषा काळे व मनोज कुंभार यांना उपनगराध्यक्ष करून राजकीय पक्षांनी दोन पावले मागे जाण्याचे धन्यता मानली होती.
हे सर्वश्रुत असतानाच आता विद्यमान नगराध्यक्षा सौ काळे यांच्या पतीकडे वडुजच्या विकास निधीसाठी तांत्रिक मंजुरी आवश्यक असल्याने या तांत्रिक मंजुरीसाठी एक टक्का निधी देण्यात आला. सदर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्यांना कामे प्रभागात मिळणार होती. त्याचे ऐवजी इतर यादी जिल्हा नियोजन कडे गेल्याने संतप्त झालेल्या एका गटाच्या काही कार्यकर्त्यानी अक्षरशा वडूज येथील शिवाजी चौकामध्येच नाट्यप्रयोग सादर केला. त्याला श्रोते व प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती.
हिंदू सणाच्या शुभारंभाच्या भोगी सणादिवशी वडूज येथील छत्रपती शिवाजी चौकात तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हा संदेश देण्याऐवजी राजकीय अभिनेवेशाने एकमेकांची चांगलीच उकळी पाकळी काढण्यात आली. वास्तविक मार्च २०२१ मध्ये सत्ता असताना वडूज नगरीसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने योजना यासाठी एक कोटी चाळीस लाख व नगरोत्सव निधीसाठी एक कोटी वीस लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.
सदरच्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर ही कामे प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. कारण, सदरची कामे वाटप करताना पूर्वीची जी यादी होती ती डावल्याचा संशय काही नगरसेवकांना झाल्याने गोंधळात गोंधळ सुरू झालेले आहे. अशी बनवाबनवी टाळण्यासाठी मग आणाबाका व शपथ घेण्यात भाग पाडले गेले आहे. तांत्रिक मंजुरीसाठी २०२१ रोजी नगरपंचायतीच्या नफा निधीत रक्कम नसल्याने काही नगरसेवकांकडून तीन लाख रुपये सदरचा निधी हा देण्यात आला असला तरी हा निधी संबंधितांकडे कडे पोच झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्धा टक्के रक्कम मधल्या मध्येच हडप केल्याची संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेमकं वडूज नगरपंचायतीमध्ये चालले काय? असा प्रश्न सुज्ञ व प्रामाणिकपणे मतदान केलेल्या मतदारांना पडला आहे.
विकास कामाचे श्रेय सर्वजण घेत असतात. परंतु, ही विकास कामे प्रत्यक्षात आपल्या प्रभागात आणण्यासाठी काय दिव्य करावे लागते .हे रस्त्यावर झालेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती पोहोचली आहे .सध्या कोणताही विकास कामे करत असताना अनेकांचे हात ओले करावे लागतात. याची प्रचिती साधारणपणे ३५ वर्षांपूर्वी आली होती. दिल्लीतून आलेला एक रुपया हा शेवटच्या देशाच्या टोकापर्यंत जाण्यापर्यंत ९० पैशाची कटोती होती आणि शेवटच्या घटकापर्यंत दहा पैसे जातात असे विनोदाने बोलले जाते. पण,हाच विनोद आता सत्य परिस्थिती निर्माण होऊ लागली की काय?असं काहींना वाटू लागले आहे.
मकरसंक्रातीच्या पूर्वी वडूज नगरीत छत्रपती शिवाजी चौकात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याबद्दल खरं म्हणजे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.असे घडायला नको होते. अशी तीव्र भावना काही नगरसेवक-नगरसेविका यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वत्र ”’आपला तो बाब्या इतरांचे कारटे”’ या न्यायाप्रमाणे वागणूक दिली जात आहे. आरोप-प्रत्यारोप तसेच अपात्रतेची खेळी होऊ लागली आहे.
दरम्यान, आरोपाबाबत दोन्ही गट व अपक्षाने इन्कार केला असून वडुजच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आम्ही कुणाच्याही एक रुपयाला मन दाखविले नाही. आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे.जनतेच्या विकासासाठी आम्ही झटत आहे असे छातीठोकपणाने सर्वजण सांगत आहेत.त्यावर लोकांचाही विश्वास बसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली तर नेमक्या सत्य काय आहे? हे जनतेला समजेल अशी आता भाबडी अशा निर्माण झालेली आहे.