मुंबई : गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्याने फार मोठी सळसळ झाली नासली तर उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. पक्ष निष्ठेसाठी मी तुरुंगात देखील जाऊन आलो, अजून काय निष्ठा हवी, असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी विचारला.
ठाकरे गटातील अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश करून राज्यात सत्ता स्थापन केली. खासदार गजानन कीर्तिकर यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (शिंदे गटात) प्रवेश करताना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. प्रवेशावर संजय राऊत यांनी भाष्य करताना वरील प्रतिक्रिया दिली.
गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिले नाही? पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असे देखील राऊत म्हणाले. न्यायाची व्याख्या काय? मला तर चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकले. तरीही मी पक्षात आहे, अशी पुष्टी राऊत यांनी जोडली.
संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते, असे राऊत पुढे बोलताना म्हणाले.