मुंबई : गुजरातमध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर नागरिकांना ५०० रुपयांत सिलिंडर, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज व शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. अशा मोठ्या घोषणा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये केल्या आहेत.
अहमदाबादमधील ‘परिवर्तन संकल्प रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधींनी ही आश्वासने दिली आहेत. गुजरात मधील निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली तरी राजकीय पक्षांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. आपने गेल्याच महिन्यात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर आता कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही गुजरातमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.
राहुल गांधी म्हणाले, गुजरात मधील नागरिकांना १० लाख नवीन नोकऱ्या देणे, ३ हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निर्मिती, मुलींसाठी मोफत शिक्षण देखील देणार आहे. गुजरातचे भाजप सरकार बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करेल, पण त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे. येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे आश्वासनही दिले. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.