दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (वय-८२) यांचे आज सोमवारी (ता.२४) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.
मुलायम सिंह यादव यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांनी ४ ऑक्टोबर १९९२ ला समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, मुलायम सिंह यांच्या निधनामुळे राजकारणातील एक मोठ व्यक्तिमत्व हरपले आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहत आहेत.