पुणे : भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी वक्तव्ये आणि महिलांचा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या रामदेवबाबा यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले आहे. तसेच रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी केली.
महिलांविषयी असभ्य आणि विकृत उद्गार काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने मुकुंदनगर येथील पतंजली दुकांनासमोर तीव्र निदर्शन शनिवारी करण्यात आली. रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला चपला आणि बांगड्यांचा हार घालताना काळी शाई फासून निषेध करण्यात आला. आधुनिक दुर्योधन रामदेवबाबाचा निषेध असो, नारी शक्तीचा अवमान करणाऱ्या बाबावर बहिष्कार घाला, अशा घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.
बाबा रामदेव यांनी आपली संकुचित आणि विकृत मनोवृत्ती वेळोवेळी दाखवली आहे. या बेताल बाबांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या पतंजली उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे तरच त्याला आळा बसेल, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या निदर्शनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, आबा बागुल, रमेश अय्यर, प्रवीण करपे, प्रशांत सुरसे, चेतन आगरवाल, प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, रोहन सुरवसे पाटील, पुष्कर आबनावे, सुरेश कांबळे, विश्वास दिघे, स्वाती शिंदे, पल्लवी सुरसे आदी सामील होते.