लहू चव्हाण
पाचगणी : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्याने स्ट्राबेरी उत्पादनाच्या माध्यमातून जगभरात नावलौकिक कमविला आहे.स्ट्राबेरीला अधिकचा दर्जा,गुणवत्ता आणि दर मिळवून देण्यासाठी या भागात स्ट्राबेरी संशोधन केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. असे मत माजी आमदार मदन भोसले यांनी व्यक्त केले.
भिलार (ता. मश्वर) येथील महाबळेश्वर फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संस्थेच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मदनदादा भोसले बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किसनशेठ भिलारे होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे,वाई तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदास पिसाळ, राजेंद्र भिलारे,माजी सभापती विजयराव भिलारे,युवानेते अनिल भिलारे,यशवंत लेले,जगन्नाथ भिलारे,बाबाजी उंबरकर,अमोल चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले, स्ट्राबेरी संशोधन केंद्राच्या माध्यमातून मश्वर तालुक्यातील वातावरणात अधिकचे उत्पन्न देणाऱ्या, चांगल्या वाणाची,चवीची आणि दर्जेदार फळ उत्पादित करता येईल.उत्पादित स्ट्राबेरीचे ब्रॅण्डिंग केले जाईल परिणामी शेतकऱ्याच्या मालाला अधिकचा दर मिळेल.आपल्या भागातील स्ट्राबेरी चे अधिक चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व्हावे यासाठी प्रयत्नशील राहू.
किसन भिलारे म्हणाले, २०१२ साली मदन दादांच्या सहकार्याने आणि पाठबळाने आपल्या संस्थेची स्थापना झाली.२०१६ साली दादांच्या सहकार्याने स्ट्राबेरी ची रोपे आयात करतेवेळी आलेली तांत्रिक अडचण नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून दूर झाली.सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आपली संस्था कार्यरत आहे.कोरोनाच्या काळात रोपे आयात करताना,ती पुरवताना आणि उत्पादित मालाची खरेदी आणि विक्री करताना एकूणच व्यवहारात आम्ही पारदर्शकता ठेवल्याने संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे.
यावेळी संस्थेचे संचालक संतोष गोळे,सर्जेराव पांगारे, सुनील उंबरकर,राजाराम भिलारे,विश्वास दानवले,वसंत चोरमले,दत्तात्रय भिलारे,वैभव भिलारे,प्रकाश भिलारे,सभासद ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विजयराव भिलारे यांनी केले. अहवाल वाचन सचिव अरविंद कदम यांनी केले. तर आभार तानाजी भिलारे यांनी मानले.