मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना काशिमीरा भागात शुक्रवारी (ता.२०) सकाळी झाली आहे. या अपघातात सावंत जखमी झाले असून त्यांच्यावर अंधेरीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सावंत हे कामानिनित्त सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. यावेळी ते काशिमीरा भागातून पालघरला जात होते. या अपघातात दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यानंतर सावंत यांना तातडीने अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अंधेरीतील रुग्णालयात डॉ. सावंत यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.