अजित जगताप
वडून : राजकारणामध्ये सध्या अनपेक्षित बदल घडत आहेत. भारिप- बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा राजकीय प्रवास करणारे ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय पटलावर शिवसेनेची आघाडी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व सातारा जिल्ह्यातील खटावचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान कोणती राजकीय चर्चा झाली नसली तरी सदरच्या भेटीमुळे खटाव तालुक्यामध्ये राजकीय ध्रुवीकरण सुरू झाल्याचे मानले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, नागाचे कुमठे गावचे सुपुत्र संदीप मांडवे यांनी स्वबळावर आपली राजकीय ताकद निर्माण केलेली आहे. कुस्तीपटू असल्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रपरिवार व हितचिंतक आहेत. कुमठे गावच्या वार्षिक यात्रेनिमित्त चार हजार लोकांनी कुस्तीचा आनंद लुटला.
तसेच यात्रेनिमित्त श्री मांडवे यांच्या घरी स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला. यावेळी कोणतीही राजकीय अभिलाषा नसतानाही संदीप मांडवे यांनी दाखवलेले राजकीय ताकद एक चर्चेचा विषय ठरली आहे. अशा कालावधीमध्ये वडूज नगरीमध्ये नगरसेविका पदी निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे श्रीमती शोभा बडेकर व स्वीकृत नगरसेवक तुषार बैले यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खटाव तालुक्यात उभा केला आहे.
याची कल्पना असल्याने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांकडे पाहिले जाते. या दृष्टिकोनातून युवा नेते संदीप मांडवे यांनी मुंबईत बहुजन नेते ऍड. आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. राजकारणामध्ये अभ्यासू व बहुजन समाजाला नेतृत्व देण्यासाठी झटणारे नेते म्हणून ऍड. आंबेडकरांकडे पाहिले जाते. त्यांची भेट घेणे हे आमचे भाग्य असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची नाते सांगणाऱ्या व्यक्तीची भेट आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. राजकारणात अनेक उलथापालथ होत असतात.
पण, या भेटीने एका मोठ्या नेत्याला भेटल्याचा मनस्वी आनंद वाटल्याची भावना संदीप मांडवे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते अजित कंठे, संतोष भंडारे, कृणाल गडांकुश, भाऊसाहेब लादे तसेच मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.