बीड : मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला.गावाचा रहाटगाडा देखील कोण हाकणार हे स्पष्ट झाले. मात्र, बीड जिल्ह्यातील एका नवनिर्वाचित महिला सरपंचाने घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली. जोपर्यंत गावाचा रस्ता होत नाही, तोपर्यंत सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नसल्याची भूमिका घेत नवनिर्वाचित सरपंच कस्तुराबाई साला पवार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन दिले.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या गांजपूर ग्रामपंचायतीमध्ये कस्तुराबाई साला पवार या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. राज्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच पदभार स्वीकारता असताना कस्तुराबाई पवार यांनी मात्र पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
गांजपूर ते तांबवा रस्त्याचे काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पदभार स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची परिसरात चर्चा पाहायला मिळत आहे.
गांजपूर व तांबवा रस्ता क्र. ३२ हा अतिरहदारीचा असुन या रस्त्याच्या बाजुला दाट लोक वस्ती आहे. परंतु हा रस्ता अत्यंत खराब व मोठ मोठे खड्डेयुक्त झालेला आहे. यामुळे दोनचाकी, चारचाकी वाहनांना व पायी चालणे देखील अशक्य होत आहे. या रहदारीच्या अडचणीमुळे अनेकांच्या जिविताला धोका झालेला आहे. मी गांजपूर गावची नवनिर्वाचीत सरपंच असुन मी पारधी समाजाची आहे. माझी पारधी वस्ती याच रस्त्यावर दोन कि.मी अंतरावर असून तेथुन मला गावात जाऊन दैनंदिन कामकाज करणे अशक्य आहे. त्यामुळे गांजपूर तांबवा रस्ता तात्काळ मजबुतीकरण डांबरीकरण करावा अन्यथा आम्ही सरपंच पदाचा पदभार स्विकारणार नाही, असे नवनिर्वाचित सरपंच कस्तुराबाई पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.