पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही पडत असताना काल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत देखील राज्यापालांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असून त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचविण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करताना राज्यपालांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले आहेत.
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते, त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यांनी सूचक वक्तव्य केले. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल हे संविधानिक पद असल्याने राज्य सरकार यात कोणताच हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती यांचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती.