पुणे : भविष्यात साखर कारखान्यांना सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरिक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉलसह सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादित केली जात आहे. त्यामुळे साखरेला किफायतीशीर दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ४६ वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यापुढ बोलताना शरद पवार म्हणाले, “साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रमाणेच सीएनजी आणि हायड्रोजन वापराकडे लक्ष द्यायला हवे. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीची वाहने अधिक मायलेज देतात.
त्यामुळे सीएनजी हे प्रभावी इंधन ठरत आहे. म्हणून साखर कारखान्यांनी याचा विचार करायला हवा असे शरद पवार म्हणाले. यंदाचा गळीत हंगाम १९१ दश लक्ष टन होईल तर मागील वर्षी १८५ दशलक्ष टन ऊसाचं गाळप झाल्याचे अंदाज पवार यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील सगळ्या भागात ऊसाचे उत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्र उभी करण्यात येणार असल्याचे शरद पवार म्हणाले. सध्या जालना जिल्ह्यात एक केंद्र झाले आहे. लवकरच नागपूर आणि अमरावतीत देखील VSI केंद्र उभारणार असल्याचे पवार म्हणाले.
तसेच पुढच्या काळात खानदेशात देखील VSI चे केंद्र उभारण्याचा उद्देश असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.