मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या २२ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये १५ मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार २२ तारखेला होणार असून, तत्काळ पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. त्यानंतर येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होतील हे जवळपास निश्चित आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट, सात राज्यमंत्री असतील. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जी अतिरिक्त खाती आहेत. ती खाती या मंत्र्यांकडे सोपवली जाणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजप, एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर शिंदे यांच्याबरोबर गेलेले अपक्ष आमदारांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांकडे आपली सल बोलून दाखविले आहे. मागील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाठ यांचे मंत्रिपद हुकले होते. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची खदखद अनेकदा बोलून दाखविले आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे.
महिलेला मंत्रिपद मिळेल का ?
सध्याच्या मंत्रिमंडळात एकही महिलेला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात विस्तारामध्ये महिलेला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.