मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेमध्ये स्वतः लक्ष घातलं असल्याचे दिसून येत आहे.
अमित ठाकरे वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असा सरळ सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अमित ठाकरे हे प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातनसले, तरी वरळीतून संदीप देशपांडे हे मनसेचे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्लांमध्ये अमित ठाकरे यांनी प्रवेश केला आहे. हे चित्र निश्चित झाले आहे.
लोकसभेत राज यांनी घेतल्या होत्या चार सभा..
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राज ठाकरे यांना मानाचे निमंत्रण न मिळाल्याने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल होती. निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी अनेक शहरांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या सभा घेतल्या होत्या. आता लोकसभा निवडणूक संपली आहे. आता आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्वच पक्षांचे नेते आता सक्रिय झाले आहेत.