पुणे : पुण्यासह राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणुक होणार असून मतमोजणी १९ ऑगस्टला होणार असल्याचे आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
सार्वत्रिक निवडणुकांकरिता आयोगाने दिलेल्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्याकार्यक्रमानुसार आरक्षणासहित अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तसेच नगर परिषदा/नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम देण्यात आला होता. त्यानुसार अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्रांची यादी ०९/०७/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
अर्ज दाखल करण्याची तारीख :
उमेदवारी अर्ज २२ ते २८ जुलै २२ पर्यन्त स्वीकारण्यात येणार असून २९ जुलै रोजी छाननी होऊन अर्ज मागे घेण्यासाठी ४ ऑगस्ट २२ ला दुपारी ३ पर्यन्त मुदत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल.या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे.
आचारसंहिता आजपासून लागू :
निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. वरील आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरिता नगर परिषदा / नगर पंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.
म्हणून निवडले जिल्हे :
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.१९७५६/२०२१ व संलग्न याचिकांमध्ये दिनांक १७/०५/२०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार आयोगाने जे जिल्हे / विभाग पावसामुळे (Monsoon) प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी व तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप त्यात बदल करावेत असे आदेशित केलेले होते. त्यानुसार भारतीय हवामान खात्यातील तांत्रिक / वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यांतील ७७ असे तालुके निवडलेले आहेत, ज्या ठिकाणी पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी आहे, असे आयोगाने कळवले आहे.
जात प्रमाणपत्र आणि राखीव जागा :
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि, जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची त्यांना मुभा देण्यात आली आहे.
०६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या राजपत्रात प्रसिध्द झाली आहे, त्यानुसार अशा उमेदवारांनी निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. या संदर्भात उमेदवाराकडून नामनिर्देशनपत्रासोबत विहित केलेले याबाबतचे हमीपत्र घेण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाऑनलाईनच्या मदतीने अर्ज भरता येणार :
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र सहजरितीने भरता यावे यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यांनी http://panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वत:ची नोंदणी (Register) करुन घ्यावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करावे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक कार्यक्रम आयोगाच्या https://www.mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.