पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुणे, सातारा, सोलापूरसह राज्यातील सतरा जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतीच्या निवडणूका बेमुदत पुढे ढकलल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज एका पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतीच्या सदस्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ८ जुलै रोजी प्रसिद्ध केला होता. मात्र या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती व 12 जुलै रोजी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
दरम्यान, या संदर्भातील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.