दिल्ली : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चन्द्रशेखर बावनकुले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. हि निवड भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रकाश नड्डा यांनी केली आहे. या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. तर मुंबई महानगर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांना नियुक्त करण्यात आले आहे.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे ऊर्जामंत्री असताना त्यांनी त्या खात्याला ऊर्जा प्रदान केली. त्यांच्याच काळात लोडशेडींगमुक्त महाराष्ट्र जनतेने बघितला. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. दोन्ही खात्यांचे काम त्यांनी उत्तम रितीने केले. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार की नाही होणार, याबाबत राजकीय जाणकारही बुचकळ्यात पडलेले होते. पण त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पक्ष देणार, हे मात्र निश्चित मानले जात होते. आणि आज त्यांच्या नियुक्तीचे पत्र येऊन धडकले आहे.
दरम्यान, चन्द्रशेखर बावनकुले आणि आशिष शेलार हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जातात. यामुळे राज्यात सरकारबरोबरच पक्षसंघटनेसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच दबदबा राहणार आहे.