पुणे : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका -२०२२ आरक्षण सोडत कार्यक्रम आता स्थगित करण्यात आला असून, या संदर्भात आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा व गोंदिया वगळून आरक्षण सोडतिला स्थगिती दिली आहे. दिनांक १३ जुलै रोजी ही सोडत होणार होती.
राज्य निवडणूक आयोगाचे दि.०५/०७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका-२०२२ करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज दि.१२/०७/२०२२ रोजी सुनावणी झाली असून एका आठवडयानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. असे राज्य निवडणूक आयोगाने आज कळवले आहे.