अहमदनगर : ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात, मात्र काही ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात.’ अशा शब्दात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राज्य सरकारच्या वतीने राज्यात लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधिमंडळात येणार असल्याने अण्णा हजारे यांनी शिंदे – फडणवीस यांचे कौतुक करताना समाधान व्यक्त केले.
सुमारे १२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी केली होती तसेच त्यासाठी अनेक आंदोलने देखील केली होती. अण्णा हजारे यांचा समावेश असलेल्या समितीने या संदर्भात अहवाल सादर केला होता. तोच अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून मंजुरी घेताना हे विधेयक मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी संवाद साधला
‘राज्य सरकारचा हा निर्णय राज्यासाठी समाधानकारक आहे. लोकायुक्त हा स्वायत्ता असलेला कायदा आहे. लोकायुक्ताला उच्च न्यायालयाचा दर्जा आहे. हा कायदा इतरांपेक्षा वेगळा आहे. लोकायुक्त एकदा नेमला की तो नियमानुसार कारवाई करू शकतो. असा हा क्रांतिकारक कायदा आहे. खरं तर हा कायदा २०११ ला लोकपालसोबतच राज्यात यायला हवा होता. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त अशी संकल्पना आहे. संसदेत लोकपाल कायदा मंजूर झाला आहे. यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. पक्षविरहित आंदोलन यासाठी उभे केले. बारा वर्षे पाठपुरावा केला. मात्र. आमच्या या तपाला यश आले, याचे समाधान आहे,’ असेही हजारे म्हणाले.
हजारे पुढे म्हणाले, ‘सत्ता ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे अनेकांचे विचार आणि बुद्धी भरकटते. ज्यांच्या जीवनात ध्येयवाद आहे, तीच माणसे असे निर्णय घेतात. फडणवीस यांच्या काळात मला आंदोलन करावे लागले. ते राळेगणला आले. त्यांना हे खटकले आपल्या निर्णय न घेण्यामुळे एवढ्या लोकांना त्रास होत आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी तेथेच लेखी आश्वासन दिले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली. त्यात जनतेचे पाच सदस्य घेतलेय मसुदा समितीच्या बैठका झाल्या. ही प्रक्रिया लांबत राहिली. मधल्या काळात सत्तांतर झाले. एकदा तर मी उद्विग्न होऊन म्हणालो की तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही. त्यानंतर फडणवीस यांनी या कामाला पुन्हा वेग दिला. अखेर मसुदा झाला आणि विधेयकही आले.’