जळगाव : सध्या कारसेवेचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. प्रत्येक जण त्यात आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता नाथाभाऊंनी कारसेवेला गेल्याचे एक 34 वर्षापूर्वीचे पत्रकच व्हायरल केले आहे. कारसेवेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातही जुंपली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही ते कारसेवक असल्याचा पुरावा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपण अयोध्येत कारसेवेला गेल्याचा दावा केला आहे. फडणवीस यांनी कारसेवेला गेल्याचा पुरावाच सादर करताच, मी बदायूंच्या तुरुंगात होतो, महाजन यांचे माहीत नाही, असे एकनाथ खडसेंनी म्हटले होते. आता तर त्यांनी 1990मधील पत्रिका दाखवली, त्यात आमदार एकनाथ खडसे असा एकनाथ खडसेंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील कारसेवकांची नावे आहेत. त्यात एकनाथ खडसेंचे नाव आहे.
काय आहे पत्रिकेत?
श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढले आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आले होते. त्यात सभा, युवक मेळावे, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर 29 सप्टेंबर 1990 रोजी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी विजय यात्रा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी प्रत्येक तालुक्यातून विजययात्रा काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या पत्रिकेतून कारसेवा नोंदणीचे आवाहनही करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील कारसेवा समिती सदस्यांची यादीही देण्यात आली होती. या यादीत आमदार एकनाथराव खडसे असा खडसे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुक्ताईनगरमधील एकमेव कारसेवक म्हणून एकनाथ खडसे यांचा या पत्रिकेत उल्लेख आहे.