मुंबई : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी होताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून एक मोदी, सब पे भारी असे बॅनर घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक बड्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे चित्र दिसून आले आहे.
सत्ताधाऱ्यांची ‘एक मोदी, सब पे भारी’ अशी घोषणा
विधिमंडळ अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत ‘एक मोदी, सब पे भारी, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘घ्या ओ घ्या… विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या…! असा आशयाचाही बॅनरवर उल्लेख होता. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून ही बॅनरबाजी करत इंडिया आघाडीविरोधात आंदोलन करण्यात आले.
विरोधकांकडून चोख प्रत्युत्तर..
पायऱ्यांवर सत्ताधारी आंदोलन करत असतानाच त्यांच्या पुढे विरोधक उभे राहिले आणि त्यांनीही राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले. अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार….!, शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, असा आशयाचे बॅनर झळकावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आमदारांनी गाजराच्या माळा हातात घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अंतरिम अर्थसंकल्पात काय असणार?
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावेळी सरकार कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकार यावेळी महिलांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. राज्य सरकार यावेळी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.