बारामती (पुणे) : बारामतीच्या औद्योगिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विकासाला आणखी चालना मिळण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने मुंबईसाठी रेल्वे सेवेची केलेली योग्य असून रेल्वे मंत्रालयाशी याबाबत चर्चा करू अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
बारामती येथील निवास्थान असलेल्या गोविंदबाग या ठिकाणी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, संभाजी माने, उद्योजक नितीन जामदार यांनी भेट घेऊन हि मागणी केली त्यावर सुळे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने बारामतीमध्ये दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत- जात असतात. एकट्या बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात तीस हजारांहून अधिक कामगार काम करत आहेत. बारामतीहून मुंबईला व मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या उद्योजक व व्यावसायिकांची संख्या लक्षणीय असून, सध्या केवळ एसटी बस सेवा उपलब्ध आहे. एसटी प्रवास वेळखाऊ असल्याने नाईलाजाने खासगी वाहनाने खर्चिक व असुरक्षित प्रवास करावा लागतो.
पुण्याहून मुंबईकडे रेल्वे गाडी बारामती होऊन पहाटे पाचच्या दरम्यान सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल. तेथून मुंबईकडे रवाना होईल तसेच मुंबईहून सायंकाळी परतताना सदर गाडी बारामतीमध्ये मुक्कामी आल्यास हजारो प्रवाशांना बारामती – मुंबई – बारामती थेट प्रवास करता येईल, असा प्रस्ताव आहे.
दरम्यान, बारामती, दौंड व परिसरातील प्रवाशांना मुंबई प्रवासाची सुरक्षित, नियमित व किफायतशीर दरात माल वाहतुकीची सोय उपलब्ध होईल. बारामती थेट मुंबईला जोडली गेल्यावर उद्योग, व्यवसायास निश्चित चालना मिळेल व रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास धनंजय जामदार यांनी यावेळी व्यक्त केला.