पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे. विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.
दरम्यान, संजय राऊत यांच्या वतीने वकिलांनी आठ दिवसांची कोठडी देण्यास विरोध दर्शवला. राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. ‘आर्थिक गुन्हे शाखेने २०२० मध्ये पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असं असतानाही संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती,’ असं निदर्शनास आणून दिलं.