नवी दिल्ली : ‘मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून संबोधू नका. असे उद्गार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना काढले. विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोदी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.(Narendra Modi)
संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यानिमित्ताने नेहमीप्रमाणे भाजपाच्या खासदारांची बैठक सपन्न झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी येताच, सर्व खासदारांनी उभे राहून घोषणाबाजी करत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला.
“लोक मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे खासदारांनी मला मोदीजी किंवा आदरणीय मोदीजी म्हणून संबोधित करू नये. मी आजही पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मी जनतेच्याच कुटुंबाचा एक भाग आहे, असे मी समजतो. लोकांना मोदी म्हणून मी जवळचा वाटतो, त्यामुळे आदरणीय मोदीजी म्हणत मला जनतेपासून दूर करू नका. माझ्या नावापुढे श्री किंवा आदरणीय असे काही लावू नका.” नेत्यांनी देखील ‘मोदी’ असाच माझा उल्लेख करावा,’ असे पंतप्रधान म्हणाले.
हा एकट्या मोदींचा विजय नाही तर कार्यकर्त्यांचाही विजय आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आहे. पण आता पुढील वाटचालीचा विचार केला पाहिजे. खासदारांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घ्यावा. कारण वर्ष २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचे आहे. राज्यांतील निवडणुकांनंतर भाजपचे सरकार पुन्हा येण्याचे प्रमाण 58५८ टक्के इतके आहे तर काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी बैठकीत दिली .