लहू चव्हाण
पांचगणी : लंपी रोगाने सर्वत्र हैदोस घातला असताना महाबळेश्वर तालुका पशुसंवर्धन विभाग मात्र झोपेत असल्याचे चित्र समोर येत आहे. याबाबत आपण उद्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, सध्या सर्वत्र लंपी रोगाने थैमान घातले असताना महाबळेश्वर तालुक्यातील पशुपालक चिंतेत आहेत. असे असताना त्यांना दिलासा देवून गावागावात जावून या रोगाबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना हा विभाग कागदोपत्री काम करताना दिसत आहे. या संकटाच्या काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यासाठी पुढे यायला हवे. परंतु या विभागाच्या डॉक्टरांची दुसऱ्या तालुक्यात नियुक्त्या लंपी रोगाच्या नियंत्रणासाठी केल्या असल्याची माहिती मिळत आहे.
महाबळेश्वर या दुर्गम आणि विस्तीर्ण तालुक्यात मात्र केवळ दोनच डॉक्टर उरले असल्याची माहिती मिळत आहे. तर सर्वत्र लस उपलब्ध झाली असून तालुक्यात अद्यापही लसीकरण होताना दिसत नाही मग या रोगांवर नियंत्रण कसे येणार आणि रोगाचा शिरकाव झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग जागा होणार का असा सवालही त्यांनी केला आहे. या सर्व बाबतीत आपण उद्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचे यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी सांगितले आहे.