पुणे : काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अमित शहा यांच्या भेटीनंतर गिरीश बापट यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती मुलगा गौरव बापट यांनी दिली आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची देखील भेट घेतली आहे. नुकतेच त्यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.
त्यानंतर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे अफवांना पेव फुटले होते. मात्र, अमित शहा यांच्या भेटीनंतर गिरीश बापट यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे त्यांचा मुलगा गौरव बापट यांनी सांगितल आहे.
गिरीश बापट यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. याचा अर्थ त्यांना प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असा होत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांची प्रकृती उत्तम आहे हळूहळू सुधारणा होत आहे फक्त थोडा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे गौरव बापट यांनी सांगितले.
गिरीश बापट यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाग घेतल्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याचं काही राजकीय नेत्यांनी म्हटलं होतं. त्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची फेसबुक पोस्ट केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील गिरीश बापट यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभाव हीच प्रार्थना अस ट्विट केलं होतं. यावरच गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी स्पष्टीकरण देत गिरीश बापट यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले आहे.