मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. राज्यात महायुतीने आपली जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे भरवण्यात आला होता. या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना केल्या.
एकसाथ, कदम मिलाकर चलना होना. असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना कानिपचक्या दिल्या. यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत, फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये आपण अडकायचं नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू…
लोकसभा निवडणुकीपेक्षा 25 लाख मतं आपल्याला मिळाली की आपण 200 जागा जिंकू एवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. आपल्याला लक्षात आलंय, ते दररोज खोटं बोलत होते, पण आपण गाफिल राहिलो. आपली लढाई फेक नेरेटीव्ह या चौथ्या पक्षासोबत होती, खोट बोल पण रेटून बोल या त्यांच्या पद्धतीचा परिणाम झाला आणि आपला पराभव झाला. सत्य चिरकाल असतं, असत्याला फार काळ नसतो. असत्यावर एक निवडणूक जिंकता येते, पण सातत्याने खोटं चालत नसतं. हे घरी नवरा-बायकोला तरी खरं बोलतात की नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
लाडक्या बहिणींनी एक गोष्ट काळजीपूर्वक लिहिली पाहिजे
गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या हुशारीवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरताना लाडक्या बहिणींनी एक गोष्ट काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, ती म्हणजे बँक खात्याचा नंबर, बँक खात्याचा नंबर चुकला तर पैसे बँक खात्यात येणार नाहीत. त्यामुळे, सर्वच महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा, कारण आम्ही ही योजना महिलांना बाहेरा टाकण्यासाठी नाही तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
शेतकऱ्यांसाठी योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये, केवळ 1 रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. देशात सर्वाधिक पीक विमा आपल्या महाराष्ट्राने दिला आहे. याशिवाय वीज बिल माफीचा निर्णय, मागेल त्याला सौरपंपही देण्यात येत आहे. आपल्याच सरकारने दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं
आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो, आज आपलेच प्रवक्ते एकमेकांवर बोलत असतात. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावे. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता अमोल मिटकरींना टोला लगावला.