पुणे : सगळीकडे लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरु आहे. यासाठी राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. निवडणुकीच्या कामांमुळे पोलिसांवर कामाचा अधिक ताण असतो. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा लेक पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी (Y+ Security) देण्यात आली आहे.
पार्थ पवार सध्या त्यांची आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेताहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या काळात पुणे पोलीस आयुक्तांकडून महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली जाते. राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाला वाय प्लस सुरक्षा दिल्याने एकूणच चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपुर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु आता ही सुरक्षा पार्थ पवारांना मिळाली आहे.
एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे. पण दुसरीकडे मात्र राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. पार्थ पवार हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मधून लोकसभेत उभे राहिले होते मात्र त्यांना यश मिळाले नाही. यंदा पार्थ पवार आई सुनेत्रा पवारांसाठी मेहनत घेत आहेत.