पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसोबत अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात ते प्रभू रामाचं दर्शन घेणार असून अयोध्येत शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलताना या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे.
पुढच्या नोव्हेंबरमध्ये आमदारांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळं आता यावरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी ते नेहमीच सोबत असायचे. मात्र आता ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रामनगरीत आपल्या आमदारांसह जाऊ रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.
ठाकरे सरकार असताना शिवसेना नेते आणि तात्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडी होण्याची शक्यता आहे.