पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले धायरी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. यामध्ये प्रामुख्याने डीपी रस्त्यांचा विकसित न केल्यामुळे धायरीकर वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. यामुळे गावचा विकास खुंटलेला आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने उपोषणस्थळी शाखा अभियंता राखी चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक व पुणे शहरचे कार्यध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, जल हक्क आंदोलन समितीचे अध्यक्ष आबासाहेब कांबळे, शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, सुनीता काळे यांच्या सह परिसरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
धायरी गावात महत्वाचे असणारे बेनकर नगर सर्व्हे.नं. ६ व ७ आणि ८ मधून ओढ्याला लागून जाणारा ६० फुटी डिपी रोड, सावित्री मंगल कार्यालय ते लोकमत ऑफिस बिल्डिंग, काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी सर्व्हे नं. ३० मधून जाणारा ते श्री कंट्रोल चौक डी पी रोड व हायब्लिस सोसायटी ते लक्ष्मी लॉज नऱ्हेगाव आदी डिपी रस्ते रखडलेले आहेत. यातील बऱ्याच डीपी रस्त्यांवर सध्या अतिक्रमणे होताना दिसत आहेत.
या डीपी रस्त्यांचा विकास झाल्यास धायरी आणि नऱ्हे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. परंतु पालिकेच्या उदासीनतेमुळे यातील एकही डीपी रस्ता विकसित होऊ शकला नाही.
यामुळे धायरीकर सकाळ आणि सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने बेनकर वस्ती येथे धायरी परिसरातील डीपी रस्त्यांचा विकास करावा यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी आम आदमी पक्षाचे नेते व धायरी गावाचे माजी सरपंच धनंजय बेनकर म्हणाले, महानगरपालिकेने धायरीकरांच्या महत्त्वाच्या असलेल्या दळणवळण मार्गासाठी डीपी रस्त्यांचा विकास करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे नागरिकांकडून भरमसाठ कर वसूल केले जात आहेत या करातून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळायला हव्या आहेत.
त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या धायरीकरांची सुटका करण्यासाठी डीपी रस्त्यांचा विकास पालिकेने तातडीने करावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेनकर यांच्याकडून देण्यात आला.