राहुलकुमार अवचट
यवत : देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असताना, महाराष्ट्रासाठी काय केले? असा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना शरदचंद्र पवार यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा विकास खुंटला होता. अशी टिकाही सीतारमण यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन दिवस दौरा पूर्ण करुन राहू (ता. दौंड) येथे आल्या होत्या. त्यावेळी महिला मेळाव्यात बोलताना वरील टोला लगावला आहे. यावेळी आमदार राहुल कुल, लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुनिल कर्जतकर, माजी मंत्री बाळा भेगडे , माजी आमदार रंजना कुल, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुढे बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, घराणेशाही हि आपल्या मर्जीतील लोकांना पदे देतात, पक्षावर आपलेच नियंत्रण कसे राहील, हे पाहतात. त्यांना भाजपावर घराणेशाही बाबत टीका करण्याचा अधिकार नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना जागतिक डिफेन्स एक्स्पो गोवा, तामिळनाडू , उत्तरप्रदेश येथे संरक्षण प्रदर्शन भरवून त्या माध्यमातून डिफेन्स कॉरिडॉर ची निर्मिती केली. तर महाराष्ट्रातचे संरक्षण मंत्री व कृषी मंत्री असताना, द्राक्ष शेतीत महाराष्ट्रासाठी काय केले? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शरदचंद्र पवार यांचे नाव न घेता केला आहे.
दरम्यान, मागील सरकारने केंद्राच्या योजना या केंद्राला श्रेय मिळु नये म्हणून अनेक योजनांना खोडा घातला, परंतु आता ती कामे जोरदार पणे मार्गी लागणार आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी गरिब जनतेला, अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पुरविणे ,बेटी बचाव -बेटी पढाव , उज्वला योजना या सारख्या अनेक योजना या महिलांना अग्रस्थानी ठेवून राबविण्यात येत आहेत. असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.