अजित जगताप
वडूज : कसबा मतदार संघातील विजयाचा आनंद वडूज येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला. यामुळे मिळालेल्या विजयाने महाविकास आघाडीमध्ये चैतन्य पसरले आहे.
पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ व चिंचवड येथील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सातारा जिल्ह्यातून उपजिवीकेसाठी तसेच व्यवसायासाठी स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. सातारावासियांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता.
विशेषत: कसबा पेठ येथील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी रणजीत देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे व अन्य कार्यकर्त्यांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचारानिमित्त आपले मित्र परिवार, नातेवाईक तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. या अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे.
सहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्यामुळे भाजपचे उमेदवार व कॉंग्रेसचे उमेदवार यांच्या विजयासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. अशा वेळेला विजयाची खात्री सर्वजण देत होते. परंतु काही चमत्कार अथवा काही मुद्दे वादग्रस्त बनवण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ग्रुपमध्ये सलोख्याचे असलेले वातावरण बिघडले होते. काहींनी व्यक्तिगत पातळीवर टीका-टीप्पणी सुरू केली.
वडूज नगरीमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, इम्रान बागवान, आबासाहेब भोसले, विकास काटकर, रोहित मोरे, सोहम गुरव, पवन पंडित, महेश काटकर, आसीफ आतार, समीर मुलाणी, अनिस काटकर, वैभव यादव, ओमकार महामुनी, गणेश काटकर, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले, विश्वास जगताप आदी मंडळींनी मतदारांचे आभार मानून जल्लोष साजरा केला. रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटप केले. सातारावासियांनी तसेच कसबा पेठ येथील मतदारांनी महाविकास आघाडीला एकत्र येण्याचाच संदेश दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिली आहे.