पुणे : पोलिस मदत आणि तक्रारींसाठी ‘डायल ११२’ या प्रणालीत आता सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आले आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिसांचे सिटिझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाइल अॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा या प्रणालित समावेश करण्यात येणार असून, त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. यामुळे पीडित व्यक्तीपर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे.
राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो.
‘११२ महाराष्ट्र’ या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हँडल्स असून, अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक आपली तक्रार नोंदवून तातडीची मदत मागू शकतील. या तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्र पोलिस दलात आणखी एका जलद प्रतिसाद सेवेला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाच्या दुरुपयोगाकडे पोलिस दलाने बारकाईने लक्ष दिले पाहिजे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत आहे, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, राज्यातील पोलिसांची कार्यक्षमता व कामगिरी वाढविणे; तसेच गुन्हेगारीला आळा, तपास, कायदा-सुव्यवस्था या दृष्टीने दर वर्षी आयोजित पोलिस घटक स्पर्धेत २०२१ या वर्षीसाठीचे दुसरे पारितोषिक पुणे पोलिसांनी पटकावले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री करंडक प्राप्त महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त रितेशकुमार यांचा गौरव करण्यात आला.