संभाजीनगर (औरंगाबाद) : संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या ६ पैकी पाच आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देताना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या एकछत्री वर्चस्वाला मोठे खिंडार पडले होते. मात्र सध्या ठाकरे गटाचे संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा व विधान परिषद मिळवून केवळ दोनच आमदार शिल्लक आहेत. तरी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये साफसफाई करायची आहे, असे विधान केल्याने सर्वानीच भुवया उंचावल्या आहेत. सं
भाजीनगर येथील महास्वच्छता अभियानाला शुभेच्छा देताना केलेल्या व्यक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी साफसफाईचे संकेतच दिले असल्याचे मानण्यात येत आहे.
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावताना शिवसेनेचे जवळपास ४० आमदार फोडत शिंदे गटाची (बाळासाहेबांची शिवसेना) स्थापना केली. यावेळी संभाजीनगर येथील ६ पैकी ५ आमदार शिंदे गटात सहभागी झाले होते. परंतु आजच्या त्यांच्या वक्तव्याने संभाजीनगरमध्ये राहिलेले ठाकरे गटातील पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाया सरसावल्या असल्याचे दिसून आले आहे.
या कार्यक्रमासाठी शिंदे यांनी संभाजीनगर विमानतळावर आगमन करतानाच माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी नम्रपणे हात जोडत आज फक्त स्वछता मोहिम, संभाजीनगरची साफसफाई करायची आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला. उद्धवसेनेच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी जास्त महत्व न देता त्यांचा हा फक्त केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले.
शिंदे व ठाकरे या दोन्ही गटाकडून सातत्याने एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. शिंदे यांनी शिवसेनेतील सुमारे ४० आमदार आपल्या बाजूने करताना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. आमदारानंतर शिंदे यांनी उरलेले पदाधिकारी यांना शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वीच्या शिवसेनेचा संभाजीनगर हा बालेकिल्ला होता. मात्र, आता ठाकरेगाटाकडे केवळ एक विधानसभा व एका विधानपरिषद असे दोनच आमदार शिल्लक आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात अजून धक्के देण्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाने मिळाले आहेत.