अजित जगताप
सातारा : शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस=महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला सेनेतील शिंदे गट+भाजप+रिपब्लिकन पक्ष=बर्म्युडा ट्रँगल असे वर्णन केले जात आहे. आता दि ५ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या दसऱ्याच्या मेळाव्याला शिवसैनिकांची ज्यादा गर्दी कोणाची? यासाठी चांगलीच चढाओढ लागली आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. अंदाजे दहा ते बारा हजार सातारा जिल्हावासीय दोन्ही बाजूला होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसेना व शिंदे गट समर्थक हे शिवतीर्थ, शिवाजी पार्क व बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलावर मोठा ताण सहन करावा लागणार आहे. राजकीयदृष्ट्या प्रथमच शिवसेना पक्षासमोर मुंबईत आवाहन देण्याचा प्रयत्न होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला रोखण्यासाठी मूळचे शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाचे हितचिंतक सज्ज झाले आहेत.शिवतीर्थ व सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक समीकरण अनेक दिवस बनले होते. हा आवाज कोणाचा? अशी आरोळी होताच ””शिवसेनेचा,,,”ही घोषणा होत होती. आता त्यामध्ये वाटेकरी निर्माण झाले आहेत.
सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ बालपण सातारा शहरात गेले आहे. सातारा जिल्ह्याने शिवसेनेला मंत्री, खासदार, आमदार,नगरसेवक, सभापती, संपर्कप्रमुख ते शाखा प्रमुख,शिवसैनिक अशी भली मोठी यादी दिली आहे. त्याच बरोबर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले दरेतांब ता. महाबळेश्वर येथील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतूनच स्वतःचा वेगळा गट भाजपच्या मदतीने स्थापन केला आहे.त्यांचे कार्यक्षेत्र पूर्वी ठाणे जिल्हा होते. आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या गरुड भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.महाराष्ट्रात काही विशिष्ठ घराण्यांच्या प्रस्थापित लोकांनाच राजकारण करता येते. ही समजूत त्यांनी अलीकडच्या काळात खोटी करून दाखवली आहे.त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
सातारा जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई,आ महेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव, रणजितसिंह भोसले, सौ शारदा जाधव, एकनाथ ओंबळे,बाळा जाधव यांच्यासारख्या शिवसेनेतून आलेले शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत.
शिवसेनेच्या सॊबत माजी आमदार दगडू सपकाळ,सदाशिव सपकाळ, उपनेते प्रा नितीन बानूगडे-पाटील, माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील,हर्षल कदम,संजय भोसले,युवराज पाटील, जयवंतराव पाटील,शेखर गोरे,रमेश बोराटे, प्रताप जाधव, हणमंतराव चवरे,अमोल आवळे अशी भली मोठी दिगग्ज नेतेगण उभे राहिले आहेत. त्यामुळे दसरा मेळावा व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
मुळातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यापूर्वी ही शिवसैनिक जात होते. त्याचे मूल्यमापन केले जात नव्हते. मिळेल त्या वाहनाने, रेल्वे, एस टी बस, ट्रक, खाजगी वाहने यातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थ याठिकाणी सहभागी होत होते. आता विभागणी झाल्याने सातारा जिल्ह्यातून किती शिवसैनिक जाणार आहेत?याचा अंदाज बांधला जात आहे. मुळातच शिवसेना या चार अक्षराने जे पायी चालत होते. त्यांच्या नशिबी चार चाकी वाहन आले आहे. तर काहींनी पदरमोड करून शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी तन-मन-धन खर्च केले आहेत. हे सुध्दा विसरून चालणार नाही.
सध्या सर्वसामान्य शिवसैनिकांना मुंबईत येऊन दोन्ही गटाचे विचार ऐकण्यासाठी जीव धडपडत आहे. पण, त्यांची साधी वाहन व्यवस्था होऊ शकली नाही. ज्यांच्याकडे गाड्या, पैसे व भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. अशी मंडळी खिश्याला चाट लावून घेत नाही. याची खंत सर्वसामान्य शिवसैनिकांना बेचैन करीत आहेत. तरी ही काहींनी हात उसने पैसे घेऊन मुंबईत जाण्यासाठी तयारी केली आहे. अशा दोन्ही गटाच्या शिवसैनिकांचे खरे म्हणजे कौतुक करावे तितके थोडे आहे.
त्यांच्या मुळेच खरं म्हणजे भविष्यातील यश अवलंबून राहणार आहे. हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे. त्यांच्याकडे सन्मानीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले तर त्याचा त्यांना निश्चितच राजकीय फायदा होणार आहे. असे सध्या तरी नमूद करावे वाटत आहे.विशेष म्हणजे जे प्रसिद्धी पासून दूर आहेत. अशा काही शिवसैनिकांनी दोन्ही मेळावा यशस्वी होण्यासाठी हे जे पायाचे दगड बनून निघाले आहेत. त्यांच्या साठी सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांना मनापासून पक्षश्रेष्ठींनी जपले पाहिजे. तीच खरी ताकद आहे. बाकीच्या बाबत तर न बोलले बरे, असे काही जाणकार सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामध्ये ही तथ्य असून याचा आतापासूनच विचार केला तर राजकीय पटलावर नक्कीच इतिहास घडले अशी आशा वाटू लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील माण,महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, वाई, पाटण, कोरेगाव, खटाव, कराड, खंडाळा, सातारा शहर व तालुक्यातील सुमारे वीस ते बावीस हजार शिवसैनिक स्वखर्चाने दसरा मेळाव्याला जाण्यासाठी मुंबईत सुध्दा पोहचले आहेत.त्यांची त्याठिकाणी ही चोख व्यवस्था करण्यासाठी मुंबई स्थित सातारकर झटत आहेत. अशी माहिती शिवसैनिक सुरेश मोरे, जितेंद्र सपकाळ, सचिन जगताप व मान्यवरांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आहे.त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अध्याप निकाल दिला नाही, पण, शेवटी कधी तरी निकाल दयावाच लागेल.तेव्हा, या धनुष्य बाणाचे तुकडे होऊ नये. अशी प्रामाणिक इच्छा शिवसैनिक बोलून दाखवू लागले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने ढाल-तलवार हे शिवसेनेचे मूळ चिन्ह मागावे अशी ही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.