CM Eknath Shinde: नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता घोटाळ्यांची यादीच मांडली. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी अशी बोचरीही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंत टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कोरोना काळात भीतीचे वातावरण असताना, बॉडीबेग, ऑक्सिजन प्लांट, खिचडी घोटाळा केल्याच म्हणत एकनाथ शिंदे यांनी कफनचोर, खिचडी चोर म्हणत भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता
काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशातील महामार्ग कंस्ट्रक्शन कंपनीला भरपूर कामे दिली. आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. भ्रश्टाचाराची खरी सुरुवात वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले.सबका एकही मालिक आणि सब का मालिक एक असल्याचे त्यांनी म्हटले. एक महिन्याचे छोटे काम दाखवून सातत्याने त्या कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली.
याच कंपनीला जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग काम देण्यात आले. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात काम देण्यात आले. हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित काम देण्यात आले. ही कंपनी काय काय करते याची यादी फार मोठी आहे. माझे डोके गरगरायला लागले असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. जिथे टेंडर तिथे सरेंडर असा प्रवास सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला आरोग्य व्यवस्थेची कंत्राटे देत या लोकांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
कोरोना काळात गरिबांना 300 ग्रॅम ऐवजी 100 ग्रॅम खिचडी दिली. गोरगरिबांच्या तोंडातील 200 ग्रॅम खिचडीचा घास हिरावून स्वतः ची तुंबडी भरली. कुणाच्या खात्यात किती पैसे हे उघड झाले आहे, ते बाहेर येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम व पाटकर यांच्याशी संबंधित आहे. पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते. त्या मालकाला माहितच नव्हते की आपले किचन खिचडीसाठी दाखवले आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे.