पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. त्यातील दोन महत्वाच्या घडामोडी म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल शरद पवारांची भेट घेतली तर आज मोदी बागेत जाऊन सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा होताना दिसत आहे. त्यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतंची एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना सुनेत्रा पवार आणि शरद पवार भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी “राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. काही ठिकाणी कुटुंब म्हणून जावं लागतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार या त्यांना भेटायला गेल्या असतील”, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं.
गावागावात दुफळी निर्माण होत आहे..
छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. आता हळूहळू या सगळ्यामुळे गावागावात दुफळी निर्माण होत आहे. एकमेकांच्या विरोधात संघर्ष निर्माण झाला असून हे सर्व थांबवणं पोलिसांनाही अवघड जात आहे. हे प्रश्न कधी ना कधी तरी संपतील, पण वैर मात्र कायम राहिली. त्यामुळे हे वैर संपावे, यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण हा राजकीय प्रश्न नसून..
“आरक्षण हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आले नाहीत. मग हा प्रश्न सुटणार तरी कसा”, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.