Chhagan Bhujbal : हिंगोली : राज्यात आरक्षणावरून चांगलीच जुंपली आहे. एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे ठहन भुजबळ दोघेही नमत घ्यायला तयार नाहीत. ओबीसी बांधवांचा महाएल्गार मेळावा आज हिंगोलीमध्ये पार पडला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सभेत आपला आक्रोष व्यक्त केला. मराठा आरक्षण ते शरद पवार संगळ्या गोष्टींवर त्यांना भाष्य केलं.
छगन भुजबळांनी भाषणाची सुरूवात करताना म्हटले की, मी काही बोललो की मी दोन समाजात तेढ निर्माण करतो म्हणतात. पण, त्यांच्या १५ सभा झाल्या. आमची एखादी सभा होते. पण, ते मला काहीही बोलत आहेत. फोन करुन मला शिव्या दिल्या जात आहेत. गलिच्छा शिव्या दिल्या जात आहेत. मला आणि कुटुंबाला दोन महिन्यांपासून शिव्या दिल्या जात आहेत. आम्ही कसं जगायचं, असा सवाल त्यांनी केला. ते दगड मारताहेत. त्यांनी घरंदारं पेटवली. मी कुठं घरं पेटवतोय. पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला, घडवायला अक्कल लागते. ज्यांचा जमीर जिंदा आहे ते आपोपाण समर्थन देतात. अगर आप जिंदा हो तो जिंदा आणा भी जरुरी है, असं ते म्हणाले.
बीडमध्ये एवढी घरे जळाली, हॉटेल जळाली तिथे जाऊन बघायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला पाहिजे होता. मी अश्रू पुसायला गेलो तर आग लावायला गेलो असं म्हटलं. त्याने काहीही करावे त्याला बोलायचे नाही. मी दु:ख सांगितले तर बदनाम करायला लागले.
भुजबळ म्हातारा झाला म्हणतात. होय मी म्हातारा झालो. तुम्हीपण एक दिवशी म्हातारे होताल. जेवढे माझे केस पिकलेत तितके आंदोलनं भुजबळाने केली आहेत. एका आंदोलनाने केसं पिकली नाहीत, असं म्हणत त्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.आमचं आरक्षण चुकीचं आहे म्हणून कोर्टात गेले आहेत. आम्हाला बाहेर काढून त्यांना आतमध्ये यायचं आहे. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देण्याचा डाव आहे. मी बीडमध्ये गेलो . त्याच्यावर टीका झाली. विचारपूस करायला देखील जायचं नाही का? हम आहं भरते है तो बदनाम होते है, वो कत्ल करता है चर्चा भी नही होता. त्याने काहीही केलं तरी बोललं जात नाही, असं भुजबळ म्हणाले.
ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. सरकारी नोकरीत आकडेवारीनुसार, १ लाख ३० हजार जागांचा अनुशेष आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक निकषावर आहे. त्यात कोण तर मराठा समाज, उरलेल्या ४० टक्क्यात मराठा समाज आणि आता आमच्या २७ टक्के आरक्षणातही मराठा समाज येतोय असं भुजबळांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा समाज १५ टक्के आयएएस, आयपीएस २८ टक्के, फॉरेन सर्व्हिस १८ टक्के, मंत्रालयात अ – ३७.५ टक्के, ब – ५२.५ टक्के, क – ५२ टक्के आणि ड -५५ टक्के लोक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाने ५१०५ कोटी रुपये वितरीत केले. १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे त्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमात ७८ टक्के मराठा समाज आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती २ लाख १३ हजार लाभार्थी आहेत. सारथी, मराठा महामंडळाला जे दिले ते महाज्योती आणि ओबीसी महामंडळाला द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली.
पहिलं आरक्षण वसंतराव नाईक यांनी दिलं, दुसरं आरक्षण शरद पवारांनी मंडळ आयोगाची अंमलबजावणी करुन 27 टक्के दिलं. शरद पवारांना कोणाचं आरक्षण कमी करायचं किंवा नवीन टाकायचे अधिकार नव्हते. तरी त्यांनी ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली. त्याबद्दल त्यांचे आभार, असं भुजबळ म्हणाले.
मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं काम करायचे, उपनिरिक्षक मराठा समाजाचा, एसपी मागासवर्गीय त्याने आता उपनिरिक्षकाला सलाम ठोकायचा. आमची लायकी नाही. हे शिकवताय तुम्ही…त्यावर बोलायला कुणी तयार नाही.
हे गावबंदी…गावागावांत बंदी, एकालाही सोडत नाही. आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे सगळ्यांना गावबंदी करणार. रोहित पवार, राजेश टोपे सगळे आले त्यांचे स्वागत करणार..असा आरोप भुजबळांनी केला. गावबंदी केल्यावर संविधानानुसार १ महिन्याची शिक्षा आहे. सरकार, पोलीस करणार आहे की नाही? संविधानातील १९ कलम काय सांगतोय…कुणालाही बंदी करता येणार नाही…काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना १ महिन्याच्या शिक्षेवर पाठवा अशी मागणी भुजबळांनी केली.
दरम्यान, छगन भुजबळ हे सभेला जाण्याआधी तीनवेळा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली असल्याने दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.