पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची त्यांनी भेट घेतली. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधला. खचून न जाता पुन्हा जोमाने कामाल लागण्याची सूचना केली. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणकीमध्ये आपलाच विजय होणार असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास दिला. भाजपाला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे पराभवामुळे काही कार्यकर्ते निराश झाले होते.
या भेटी दरम्यान पालकमंत्री पाटील म्हणाले ” संघर्ष हा भाजपाचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवून लावली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोटनिवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. तसेच सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी मृणाली रासने यांनी ‘निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार’ असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.