पुणे : माजी मंत्र्यांच्या मुलीने एजंटला पैसे देऊन परीक्षा पास केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवेत आहेत. १०२ आणि १०४ क्रमांकावर त्यांची नावं आहेत. सिल्लोडमधील एका संस्थेवर त्या दोघीही शिक्षिका असून त्या अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. राज्यमंत्र्यांच्या मुलीच पैसे देऊन उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतानाच निकाल होण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला.
उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.
दरम्यान, सत्तार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलींनी २०२० मध्ये टीईटीची (TET) परीक्षा दिली होती. आणि त्या या परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव कसे आले. तसेच या संबंधात जर माझ्या संस्थेकडून शिक्षण विभागाला किंवा कोणाला एखादे साधे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा असेही अब्दुल सत्तार म्हणाले. हा माझ्या बदनामीचा कट असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनातर्फे करत आहे.