पुणे : सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. याची माहिती खुद्द सिसोदिया यांनीच ट्वीट करत दिली आहे.
आज सकाळी सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे.
सीबीआयच्या या कारवाईनंतर सिसोदिया यांनी तीन ट्वीटमध्ये म्हणले आहे कि, “सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनिष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असेदेखील सिसोदिया म्हणाले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यांनी ट्वीट करत या काराईचा निषेध केला आहे. ट्वीटमध्ये म्हणले आहे कि, ‘ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदियाचे छायाचित्र अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर छापले गेले, त्याच दिवशी केंद्राने CBI ला मनीष यांच्या घरी पाठवले. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.