Babanrao Taiwade : नागपूर : मराठा आरक्षण…कुणबी प्रमाणपत्र…ओबीसी कोटा…हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. त्यातच आता ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात तायवाडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याची तक्रार झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विकी उरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांची आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांना लक्ष्य केले होते.
बबनराव तायवाडेंवर गुन्हा दाखल
ओबीसींच्या दुसऱ्या सभेत मनोज जरांगेंवर टीका करताना बबनराव तायवाडे म्हणाले होते की, “तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करता. आमच्या नेत्याला शिवीगाळ करता. त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या नेत्याकडे बघणाऱ्याचा डोळा काढण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे कुणी तशी हिंमत करू नये. आमची लायकी काढत आहात. यांना आमची लायकी काढण्याचा अधिकार कुणी दिला? ओबीसी, एससी, एसटी या तीन जातींचा जरांगे-पाटील अपमान करत आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? लायकी काढण्याची हिंमत कराल, तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू.” त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बबनराव तायवाडेंच्या सुरक्षेत वाढ
दुसरीकडे, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कारण, डॉ. तायवाडे यांना फोनवरुन धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः तायवाडे यांनी याबाबत माहिती दिली असून आपण कोणत्याही धमक्यांना भीक घालत नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. माझे भाषण ऐकून काही जणांनी वेगळाच अर्थ काढला आहे. धमकी देताना तुम्ही असे बोललात तस बोललात असे मला त्यांनी सांगितले. पण मी त्यांना म्हटलं मी वाईट काय बोललो आहे, त्याचं रेकॉर्डिंग मला पाठवा. त्याशिवाय मी तुमच्याशी असे परस्पर बोलणार नाही. त्यांना धमकीचे फोन येत असल्याने त्यांची आज सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी एक बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आला आहे.