मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’च्या वतीने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’च्या दुसऱ्या वर्षासाठीची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (गुरुवार)केली.
कृषी, साहित्य, आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी या फेलोशिपच्या माध्यमातून प्रेरीत केले जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. एमकेसीएलचे चीफ मेंटॉर शिक्षण फेलोशिपचे मुख्य समन्वयक विवेक सावंत, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे सीईओ व कृषी फेलोशिपचे मुख्य समन्वयक निलेश नलावडे, साहित्य फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. नितीन रिंढे यावेळी उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फार्म नाशिक यांचे तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एम के सी एल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या फेलोशिपची घोषणा आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला आज करण्यात आली.
कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी उद्यापासून www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर २०२२ ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशीप’ साठी १० तर शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिप साठी ४० अशा एकूण १३० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल, असे सुळे यांनी सांगितले. तिन्ही फेलोशिपचे वार्षिक वेळापत्रक फेलोशिपच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.