Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार कोसळणार आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. फक्त आता आधी सही कोणी करायची हेच बाकी आहे. असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकारण तापणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवार (आज) जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राऊत म्हणाले, पुढच्या 15 ते 20 दिवसांत शिंदे, फडणवीस सरकार कोसळणार असून या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. फक्त आता आधी सही कोणी करायची हेच बाकी आहे. तसेच जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आपण सुवर्ण नगरीत आहोत, काही दिवस ते आमच्यामध्ये सोनं म्हणून वावरत होते. मात्र कोळसा निघाले. आजच्या सभेत भांडाफोड करू अशा शद्बात त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. गुलाबराव पाटील यांनी आधी राजीनामा द्यावा, कारण ते शिवसेनेच्या नावावर निवडून आल्याचं राऊत यांनी म्हटले आहे.
राधाकृष्ण पाटील यांना घेतले फैलावर..
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विखे पाटलांनी अनेकांना वेड्यात काढलं आहे. ते अनेक पक्षात गेले आहेत. सत्ता बदलली तर ते परत तिकडे जातील. विखे पाटलांच्या मनातील मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी त्यांना मुख्यमंत्री करावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.